पुणे, २४ नोव्हेंबर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागात पाऊस झाला आहे. आजही दक्षिण कोकण आणि घाट परिसरात पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज एकूण चार जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत येथे मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने आज सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी पिवळा अलर्ट जारी केला आहे. येत्या तीन ते चार तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान आकाशात विजा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आकाशात विजांचा लखलखाट होत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच मोठ्या झाडाच्या कडेला उभे राहू नये, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे दुसरीकडे पुण्यासह सांगली, सोलापूर जिल्ह्यांतही आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळपासून येथे अंशतः ढगाळ वातावरण होते. उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर पूर्णपणे कमी होणार आहे. पुढील चार दिवस राज्यात कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचे प्रमाण वाढले आह पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळपासून पुण्यात अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण होते. त्यामुळे येत्या तीन-चार तासांत आजही पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील चार दिवस पुण्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे


